कराड : येथील शनिवार पेठेतील चौकालगत रस्ते झाडत असताना पालिकेच्या महिला सफाई कामगारास एकाने मारहाण केली. ही घटना बुधवार दि. 5 रोजी सकाळी 6 ते 6.30 वाजण्याच्या दरम्यान घडली. तरी मारहाण करणाऱ्या रहिमतुल्ला मोमीन याच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांना देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड नगरपालिकेच्या सफाई कामगार ललिता भाऊ लादे, मुकादम संजय बाबा भोसले, सुनिता नागाप्पा आठवले व अन्य सफाई कामगार नेहमीप्रमाणे शनिवार पेठेतील मुळीक चौकालगत रस्ते झाडत होते. यावेळी रहिमतुल्ला मोमीन (रा. शनिवार पेठ, कराड) याने घरातून पळत येऊन ललिता लादे यांना शिवीगाळ केली. व मोमीन याच्यासह पत्नी व मुलगा या तिघांनी दगडाने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच शिवीगाळ करत हातातील दगड व बूट घेऊन सफाई कामगारांचा पाठलाग केला. या मारहाणीबाबत ललिता लादे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात मोमीन याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे याप्रकरणी निवेदन सादर करण्यात आले आहे. यावेळी कराड नगरपालिकेचे सर्व सफाई कामगार उपस्थित होते.
No comments: